वैचारिक लेख मुक्तांगण
महिला सक्षमीकरण काळाची गरज
परवाचीच गोष्ट ,आमच्या कामवाल्या मावशीं सोबत एक चुणचुणीत १४-१५ वर्षाची मुलगी मदतीला म्हणून आली . फरशी पुसण्यासाठी ती बादलीत पाणी घेऊन हॉलमध्ये आली जवळच टेबलावर माझ्या मुलाचं पुस्तक पडलेलं तिनं उचललं आणि चाळू लागली , मी तिला विचारलं "वाचता येत का तुला ?" हो येतं ताई ! मी तीला तिचं नाव विचारलं तिनं तिचं नांव 'प्रिया' सांगितले , कोणत्या वर्गात शिकते ? मी पुढे विचारलं , लगेच तिनं ओढणी खालील मंगळसूत्र वर करुन दाखवले , "लग्न झालं मावशी माझं ,मागच्याच वर्षी "!
मला शिकायचं होतं पण ९वीत असतांनाच लग्न करून टाकले .. पाणावलेल्या डोळ्यांनी ती सांगू लागली . तिच्या कडे पाहून तिची दया येत होती .ज्या वयात खेळायचे बागडायचे त्या वयात तिच्या डोक्यावर संसाराचं ओझं लादलं गेलं .
आजही एकविसाव्या शतकात ही आपल्याला 'प्रिया' सारख्या अनेक मूली पहायला मिळतात ज्यांना अर्ध्यात शिक्षण सोडायला भाग पाडून संसाराचे ओझं त्यांना दिले जाते.मन मारुन जगावं लागत आहे. ही दुर्दैवाची गोष्ट आहे .
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जागोजागी सांस्कृतिक कार्यक्रम, सभा घेतल्या जातात . त्यात महिला सक्षमीकरण या विषयावर भाषणे दिली जातात त्यात इंदिरा गांधी, सावित्रीबाई फुले, पी.टी .उषा., किरण बेदी, या सारखे मोजकेच नांवे घेऊन समाधान मानतात .
पण बाकीच्या महिलांचे काय?
त्या आजही मानसिक दृष्ट्या सक्षम नाहीत .
आज महिला वर्ग सुशिक्षित आहे ,पण काही महिलांना घरातील व्यवहार माहित नसतात . घरच्या संपत्तीची माहिती त्यांना नसते . बॅंकेचे व्यवहार त्यांना माहित नसतात . त्याचा उपयोग फक्त सही करुन घेण्यासाठी होतो .
घरातील एक मोलकरीण म्हणून काही घरांमध्ये स्त्रीला वागणूक दिली जाते .
ठिक ठिकाणी 'बेटी बचाओ ,बेटी पढाओ' चे पोस्टर पाहून मला एक प्रश्न पडतो 'ज्या मुली जिवंत आहेत , ज्या सुशिक्षित आहेत त्या सुरक्षित आहेत? सुखी आहेत ?
आजची स्त्री सुरक्षित नाही मग ती पाच वर्षांची चिमुकली असो वा चाळीस वर्षीय महिला असो. ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही . मुलगी शाळेतून सुखरूप जोपर्यंत घरी येत नाही तोपर्यंत पालकांचा जिव टांगणीला लागलेला असतो. आज प्रत्येक महिला घरातून बाहेर पडते ती जिव मुठीत धरूनच ! कारण जागोजागी हल्ला करणारे नराधम टपलेले असतात . घरात आणि घराबाहेर तिला एका विशिष्ट मानसिक दडपणाखाली वावरावे लागते . कधी कुठून तीच्या क्षीला वर संकट येईल सांगता येत नाही . लहान चिमुकल्या मुलींवर आणि महिलांवर लैंगिक अत्याचारांच्या बातम्या रोजच कानी पडतात . हुंडाबळी , अंधश्रद्धा बळी अशाप्रकारच्या कित्येक घटना रोजच समोर येतात . काही घटना बदनामीच्या भीतीने समोर येऊ दिल्या जात नाहीत . काही पिडित महिला आवाज उठवतात . पण त्यांचा आवाज दाबुन टाकला जातो . काहींना न्याय मिळतो पण उशिरा .
जर स्त्री विधवा झाली आणि तिला मुलगा नसेल तर तिची संपत्ती मिळविण्यासाठी तिला सर्वोतोपरी त्रास दिला जातो. फार दूरचे उदाहरण नाही देत , माझेच काका आईला सांगतात "माझ्या मुलाला दत्तक घेतले ठीक , नाहीतर तुला मुखाग्नी कोणीही देणार नाही ".
हे वाक्य ऐकून मन सुन्न झाले !
आज आम्ही लढत आहोत न्यायासाठी . काकांनी आमच्या संपत्तीत हिस्या साठी कोर्टात दावा दाखल केला आहे . पुरुषप्रधान रुढी आणि परंपरा बनविणार्या समाजाला मझा प्रश्र्न आहे . मुलींनी मुखाग्नी दिला तर मुक्ती मिळत नाही का ? त्या साठी मुलालाच जन्म द्यावा लागतो का ?
आज प्रत्येक स्त्री प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे सामाजिक आणि पारिवारिक दाबावाखाली वावरते . सामाजिक आणि पारिवारिक बांधिलकी जपताना तिच्या मनाची होणारी घुसमट ती कधीही दिसू देत नाही . हा तिच्या मनाचा मोठेपणा आहे .
आज सर्वच ठिकाणी शहरांचे विस्तारीकरण झालेले दिसून येते शहराभोवतीचे लहान लहान खेडे शहरांमध्ये विलिन झाले . शेणामातीचे घरांचे रुपांतर सिमेंट कॉंक्रीटच्या बंगल्यात झाले आहे पण खेड्यातल्या रूढी परंपरा , अंधश्रद्धा मात्र तश्याच शेणामातीच्या घराप्रमाणे जुनाट मानसिकता प्रत्येकाच्या मनात घर करून आहेत .
एखादी नवं वधु जेव्हा लग्न करून सासरी येते तेव्हा तीच्या डोळ्यात नवीन सुखी संसाराची स्वप्नं असतात . पण तिला समजून घेणारे आणि नवीन कुटूंबातील रीतीरिवाज समजावून सांगणारे फार थोड्या प्रमाणात पहायला मिळतात बर्याच ठिकाणी तिला नवीन कुटुंबातील व्यक्तींना समजून घेण्यासाठी परंपरा जपताना तीची तारेवरची कसरत होत असते . यात ती कधी यशस्वी होते तर कधी अपयशी होते पण घरातल्या सगळ्यांच्या आवडीनिवडी जपण्याचा ती मनापासून प्रयत्न करत असते . दुर्दैवाने जर तिला वैधव्य आले तर तिला टोचून टोचून बोलले जाते . तीला कपाळ करंटी नशीबात आली ,नवरा खाऊन गेली . असे बोलणे प्रत्यक्षरित्या अप्रत्यक्षरित्या ऐकावे लागते .
तिच्या सुखी संसाराची राखरांगोळी झाली तिचे स्वप्न भंगले हे तिचे दुखः कोणीही समजूत घेत नाही उलट तिला मानसिक त्रासाला सामोरं जावं लागतं . आता मला समजत नाही ती नरभक्षीणी आहे का? का तिला माणसे खायचा शौक आहे ? असंच जर पुरुषाच्या बाबतीत घडले त्याची बायको जर वारली तर त्याला कोणी कपाळ करंटा बोलणार नाही उलट बायकोचे तेरावे करुन काही दिवसांत लगेच बोहल्यावर चढायला तयार करतील . आजही काही भागात विधवा स्त्रिया घुसमटत आयुष्य जगावे लागते . फार क्वचित घरांमध्ये त्यांना पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले जाते .
मुलं झाली नाहीत तर तिला वांझोटी म्हटले जाते ,मग त्या मागचे वैद्यकीय कारण काहीही असो !
काही घरांमध्ये मुलं आणि मुली यांचे संगोपन करताना दुजा भाव केला जातो . तिच्या भावनांना सर्वच ठिकाणी माघार घ्यावी लागते .
आपण म्हणतो मूलगी शिकली प्रगती झाली .
आज खरोखरच शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात महिला वर्ग सुशिक्षित आहे .
पण कामकाजाच्या ठिकाणी , रस्त्यावर, घरात सुरक्षित आहे का?
आता कुठंतरी हे थांबायला हवे !
'मुलगी वाचवा आणि मुलगी शिकवा' या सोबतच. तिला सुरक्षितता द्या स्वरक्षणाचे आत्मनिर्भरतेचे धडेही तिला द्यायला हवे .
पुरुष प्रधान समाजाने तिला खर्या अर्थाने समजून घेण्याची गरज आहे .
आजची प्रत्येक स्त्री द्रोपदी सारखी लाचार बनून कृष्णाला हाक मारत आहे , आज ती प्रत्येक पुरुषातं रक्षण करणारा कृष्ण शोधत आहे .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा