वैचारिक लेख
✍✍विषय - संवाद झाला मुका
आपल्या मनांत सतत काहीना काही विचार चालूच असतात . त्याच विचारांचे रुपांतर चांगल्या वाईट भावनांमध्ये होते . आपल्या भावना कोणाच्या जवळ तरी व्यक्त करावं असं प्रत्येकाला वाटतं पण आपण सर्वच गोष्टी सर्वांजवळ बोलत नाही . जिथे मायेची माणसं असतात जिथे आपल्याला खात्री असते की , आपल्याला समजून घेतलं जाईल तिथेच आपण मनातील भावना व्यक्त करत असतो . तेव्हा जो संवाद घडतो त्यातून विश्र्वास आणि प्रेम मिळेल अशी अपेक्षा आपण करतं असतो .
माणूस हा समाज प्रिय आहे .त्याला एकटे राहायला आवडत नाही त्याला समाजात चारचौघांत रहायला आवडते मिसळायला आवडते . पण प्रत्येकाच्या व्यस्त जीवन शैली मुळे एकमेकांना भेटणे संवाद साधणे शक्य होत नाही . मोबाईलवर तुटक्या शब्दात बोलून नाही तर मुक्यानेच मेसेजेस करुन प्रत्येक जण तुटक्या शब्दात संवाद साधतात . त्यामुळे बहुतांश नात्यात दूरावा निर्माण झालेला आपल्याला आजच्या काळात दिसून येतो .
पूर्वी आपल्याकडे खेडोपाडी एकत्र कुटुंब पद्धती होती . पूर्वी लोकं फार सुशिक्षित नव्हते . पुरुष वर्गाला तरी वाचता येईल लिहिता येईल इतपत शिक्षण दिले जाई पण महिला वर्गाला मात्र शाळेत जाऊ दिले जात नव्हते . शेतीच सांभाळायची आहे ना ,मग जास्त शिकून काय करायचे ? शेतात कोण राबणार ? अशा विचारसरणी असलेले आपले पूर्वज होते . त्यांच्या जवळ धनदौलत जास्त नसली तरी पण मनाची श्रीमंती अमाप होती .
पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती रुढ होती .शेतीचे कामे घरातील सर्वजण एकत्र मिळून मिसळून करत . एकमेकांची सुखदुःख वाटून घेत एकमेकांना आधार देत . लिहिता वाचता फारसं येत नसलं तरी तर्क बुध्दीने संकटांना एकत्र समोरे जात असे .
तसेच गावातही तशीच एकी होती . गावात एखाद्या घरी लग्न असलं तर गावातील सर्वच जण मदत करायचे .
एखाद्या घरी जर कोणाचा मृत्यू झाला तर गावात त्या दिवशी एकही घरात चूल पेटत नसे . हा जिव्हाळा हे प्रेम आता पहावयास मिळत नाही . आता पहावयास मिळतात ते हेवे आणि दावे . शेतातील कामे आटोपून घरी जेवण करून सर्वच जण गाव चावडीवर बसून गप्पा मारत एकमेकांचे सुखदुःख वाटून घेत . त्यावेळचा तो एकमेकाशी साधलेला संवाद मनाला फार मोठा आधार देऊन जायचा . घरातील वडीलधारी मंडळी आपल्या नातवंडांना विविध गोष्टीं सांगत . त्यातून मुलांच्या मनात चांगल्या विचारांचे बीज पडत असे मग त्यातूनच चांगले संस्कार मुलांना मिळत असे .
पूर्वी प्रत्येक नात्यात प्रेमाचा ओलावा होता . पण तसे राहिले नाही . आता सर्वच नाते व्यवहारापूर्ते ,कोरडे झालेत .वरवर जरी चांगले वाटत असले तरी आतला प्रेमाचा झरा आटला आहे . संवादातही तोकडेपणा आला आहे . मोजकेच बोलणे आणि कामापुरतेच भेटणे अशी आजची परिस्थिती आहे . आजचा माणूस सुशिक्षित झाला आहे औद्योगिकक्षेत्रात प्रगती केली आहे . शेती देखील तो आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून केली जाते . जास्त धनदौलत कमविण्याच्या नादात माणूस माणसापासून दूर जात आहे . माणूसकी चे नाते आता लोप पावत चालले आहे . नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने शहरात वास्तव्य करत असलेल्या माणसाला गावात राहणाऱ्या आपल्या म्हातार्या आई-वडीलां सोबत बोलायला वेळ नाही . गावातील वयस्कर मंडळी फोनकडे टक लावून पाहत बसतात, आज माझ्या लेकाचा फोन येईल . एखादा सण आला की दारातून दिसणार्या प्रत्येक वाहनाकडे आशेने पाहतात . एक एक दिवस मावळतो आणि त्या जिर्ण झालेल्या बुबुळांत नकळत अश्रू देऊन जातो .
ज्यांच्या कष्टाच्या जोरावर प्रगती केली . दर्या आईबापाने सारी जिंदगी लेकरांसाठी वाहिली आज तेच प्रमेच्या मायेच्या दोन शब्दांना पारखे झालेत .
व्हाटसॅप आणि फेसबुक वर मदर डे ,फादरर्स डे चे मोठे मोठे मेसेजेस मुक्याने टाकण्यापेक्षा त्या आईबापांना वेळ द्या . त्यांना तुमची गरज आहे तुमच्या मेसेजेस ची नाही .
आज वृध्दाश्रमातील प्रत्येकजण मोठ्या आशेने आपल्या लेकरांची वाट पाहत असतो . त्यांच्या मनातील मुक्या संवादाला बोलत त्यांना आपल्या लेकरांजवळ करायचं असतं .
मनातील भाव झाला फिका
नात्यातील संवाद झाला मुका संवाद झाला मुका !
🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂
✍🏻सौ . सुवर्णा सोनवणे चाळीसगाव.
७७४४८८००८७
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा