मी बदलेल तरच जग बदलेल नवा संकल्प

वातावरणातील गारठा थोडा वाढलेला जाणवत होता. सकाळी हातात वाफाळलेला चहाचा कप घेऊन सोफ्यावर बसली सहज भिंतीवर असलेल्या कॅलेंडर कडे माझे लक्ष गेले. आपण आता शेवटच्या आठवड्यात आहोत. हे वर्ष तसं प्रत्येकाचे संघर्ष करण्यातच गेले.‌ जो तो आपला जीव मुठीत धरून एक एक दिवस पुढे ढकलत होता. ह्या वर्षात प्रत्येक जण हेच शिकला जीवन आहे तर संपत्ती आहे. नाही तर सगळंच बेकार आहे. माझी माणसं हीच माझी खरी संपत्ती.
पण माझी ही संपत्ती माझ्यासाठी अनमोल असलेली ही संपत्ती खरंच मी मनापासून जपते का कि नुसतं निभावावं लागतं म्हणुन निभावत आहे.  तसं असेल तर विचार करण्याची गरज आहे. आपण आता वर्षाअखेरच्या  उंबरठ्यावर येऊन पोहोचलो आहोत. दोन तीन दिवसांनी भिंतीवरचे कॅलेंडर बदलेल. पण मी आणि माझे विचार बदलतील का ? की नवीन वर्षात ते तसेच राहतील. प्रत्येक जण हाच विचार करतो समोरची व्यक्ती बदलेल तरच मी बदलेल. सर्वजण हाच विचार मनात ठेवून समोरच्या व्यक्तीला गॄहित धरत असतात. असं गृहीत धरून प्रत्येक नाते संबंधाची दोरी आता नाजुक झाली आहे. 
   आकाशात रोज सुर्य उगवतो आणि मावळतो. त्याच्या उगवल्याने दिवस सुरू होतो आणि संपतो. ठराविक कालखंडानंतर वर्ष बदलते .असे युगानुयुगे सुरू आहे आणि सुरु राहणार आहे. हे कालचक्र असेच फिरत राहणार. सुर्य आपल्याला आणि प्रकृतीलील सर्व प्राणीमात्रांना एक सारखा प्रकाश देतो एक सारखी ऊब देतो. कोणताही भेदभाव न ठेवता. तो कधी असा विचार करत नाही ह्यांच्या कडून मला काय मिळणार आहे का मि रोजरोज ऊब देऊ ? असं कधी झालं आहे का आज सुर्य उगवला नाही त्याचा प्रकाश मिळाला नाही. नाही अस कधीच झाले नाही. तो त्याच्या नियमित वेळेत उगवतो आणि मावळतो.‌ आणी सर्वांना एकसमान ऊर्जा देऊन पालन पोषण करतो. निस्वार्थ प्रेम भाव शिकावा तो सुर्या कडून.कोणा कडून काहीही अपेक्षा न ठेवता युगानुयुगे फक्त आणि फक्त देतच आला आहे  काहीही मोजमाप हिशोब न ठेवता . तो देणारा आहे म्हणून आपण त्याला सुर्यदेवता म्हणतो. 
   पण मानवाचे आज याउलट झाले आहे 
स्वार्थी आणि लोभी स्वभावामुळे मानवाच्या मनातील अहम् जागा झाला आहे. यामुळे दिल्या घेतल्या सर्वच बाबींचा हिशोब ठेऊ लागला आहे. स्थुल बाबींचे ठीक आहे ती गरज आहे काळाची पण सुक्ष्म बाबींचा पण हिशोब ? म्हणजे प्रेम , आपूलकी मानअपमान याचा पण सुक्ष्म हिशोब त्याच्या मनाच्या डायरीत कोरलेला असतो. 
  आपण वर्षाच्या सुरुवातीला चांगला संकल्प करतो. ह्या वर्षात मी असं करेन तसं करेन पण , निम्म्याहून अधिक लोकांचे संकल्प फक्त संकल्पना म्हणूनच राहतात जसे जसे दिवस जातात ते संकल्प पण विरुन जातात.
ते पुर्ण का होत नाहीत ? आपण याचा विचार केलाय कधी ? नाही ना  मग आता करु या असं का होतं आपण काही ठरवतो आणि ते पुर्ण होत नाही .
ह्याची अनेक कारणं आहेत. तुमच्या संकल्पांमधे दृढता नसते, तुम्ही केलेल्या संकल्पनांना हेव्याची किंवा ईर्षा द्वेषाची झालर लागलेली असते.
संकल्प कोणतेही असुद्या त्यांच्यात हट्ट असेल कोणास खाली पाडण्याचा तर तो संकल्प कधीही पुर्ण होत नाही आणि झालाच तर त्याचे सुख क्षण भंगुर पण त्या व्यक्ती बद्दल चा राग मनाला शांती मिळू देत नाही.
मन नेहमी अशांत अतृप्त च असते .
मनाला तृप्ती हवी असेल तर अमाप प्रेम करायला शिका .
प्रेम द्यायला शिका. मन स्वच्छ ठेवून प्रत्येका सोबत प्रेमाने बोलायला शिका चुका प्रत्येका कडून होत असतात . मन मोठं करुन माफ करायला शिका. समोरच्या व्यक्तीला समजून घ्यायचा प्रयत्न करता यायला पाहिजे. त्याने दिलं नाही तर मि का देऊ असा विचार बदलायला पाहिजे .
त्याने नाही दिलं ना काही हरकत नाही मी देणार भरभरून प्रेम देणार. प्रकृतीचा नियम आहे तुम्ही जे द्याल ज्या भावनेने द्याल ते जसेच्या तसे तुम्हाला परत मिळते . मग तुम्ही काय देता प्रेम भावना की  द्वेष भावना जे द्याल ते तुम्हाला व्याजासकट परत मिळते हे नक्की आहे. राग द्वेष मनात ठेवून मनावर जी अहंकाराची कड चढली आहे त्याने मनात नकारात्मक विचार , व्यर्थ विचारांचे ओझे मनावर अधिक आहे  आज मानवाची अवस्था सतत एका फांदीवरून दुसर्या फांदीवर उड्या मारणार्या माकडा सारखी झाली आहे. मनात हजारो व्यर्थ आणि नकारात्मक विचारांचे तांडव सुरु असते आपण मोजू पण शकणार नाही त एवढे विचार तासाला मनात फिरत असतात. त्या द्वेष , ईर्षा भाव , क्रोध , मोह लोभ  भरलेला असतो आणि तिथूनच अहम् जन्माला येतो .
आणि अहम् फक्त घ्यायला शिकवतो द्यायला नाही .
मग ते प्रेम असो किंवा सन्मान असे सर्वांना मोबलक प्रमाणात  पाहिजे असतो .पण द्यायच्या वेळेस सर्व हिशोब लावून दिला जातो .
हेच कुठं तरी थांबायला हवे .
प्रेम द्या सर्वांना ते दिलखुलासपणे मनसोक्त द्या कोणतीही अपेक्षा न ठेवता द्या कोणी  कसं का वागेना आपण फक्त देऊन बघा एक ना एक दिवस तेच प्रेम प्रकृती कडून व्याजा सकट परत मिळेल .
देतांना फक्त हिशोब लावून देऊ नका .
गीतेत भगवंतानी सांगितले आहे 
तु फक्त कर्म करण्यास बांधलेला आहेस 
त्या कर्माचे फळ देण्यासाठी मी आहे .
चला तर मग , नवीन वर्षात आपण कुठलीही अपेक्षा न ठेवता प्रेम देण्याचा संकल्प करूया. चला आपण स्वर्ग धरतीवर आणू या फक्त दोन शब्दांचे प्रेम वाटू या 
मी बदलेल तर माझे जग बदलेल 
चला नवीन संकल्पना राबवू या .



टिप्पण्या