वैचारिक लेख
फिरून पुन्हा या स्री जन्मात येईन मी '
➖➖➖➖➖
२२जानेवारी २०१५ रोजी देशाचे मा.पंतप्रधान यांनी 'मुलगी वाचवा आणि मुलगी शिकवा 'या अभियानाची घोषणा केली.सर्वच स्तरातून त्याचे स्वागतही करण्यात आले . महिला वर्गाचे घटते प्रमाण हा खरोखरच चिंतेचा विषय बनला आहे . पण आज प्रत्येक मुलीला तिच्या मनात एकचं प्रश्र्न पुन्हा पुन्हा घुटमळत आहे, ज्या मुली जिवंत आहे ज्या शिकलेल्या आहेत त्या खरंच सुखी आहेत का? सुरक्षित आहेत का ?
आज स्त्री शहरातील असो वा खेड्यातील असो ती सुखी ही नाही आणी सुरक्षित ही नाही . आज शाळेत गेलेली लहान मुलगी सुध्दा सुखरूप घरी परत येईल की नाही याची भीती पालकांना वाटत असते . वासनेच्या अति आहारी गेलेले नराधम जागोजागी टपलेले आहेत.
रस्त्यावर चालताना स्रीला जिव मुठीत धरुन चालावे लागते.अशा अत्याचाराच्या कित्येक घटना समजा समोर येतात तर काही बदनामीच्या भीतीने तिथेच दाबल्या जातात. काहि जणी अन्यायाविरुद्ध आवाज उठवतात तर काहींचा आवाज बाहेर पडायच्या आधिचं बंद केला जातो . ज्या आवाज उठवतात त्यांना प्रत्येकीला न्याय मिळतोच असं नाही .. स्वत:साठी न्याय मागताना तिला अनेक ठिकाणी अपमानित व्हावे लागते ..
'मुलगी वाचवा मुलगी शिकवा' या सोबतच मुलीला मानसिकरीत्या सशक्त बनवा आत्मनिर्भर बनवा ' अशी ही घोषणा करा.
महिला दिनाचे औचित्य साधून जागोजागी विविध वैचारिक सभा घेतल्या जातात.. शाळा कॉलेजात आणि इतर सार्वजनिक ठिकाणी विविध रॅलींचे आयोजन केले जाते. महिला सबलीकरणाचा विषयही मांडला जातो आणि इंदिरा गांधी, किरण बेदी,कल्पना चावला,पि.टी.उषा,मदर तेरेसा ह्यांच्यासारख्या बोटावर मोजता येतील इतक्याच सबल महिलांचे नाव घेऊन त्यांचे कौतुक करुन समाधान व्यक्त केले जाते .
पण बाकी ज्यांना घरात आणि बाहेर रोज मानसिक आणि शारीरिक त्रास निमुटपणे सहन करावा लागतो त्या महिलांचा विचार कुठेच होत नाही . स्री सुशिक्षित असो वा अशिक्षित ती घरात आणी बाहेर मानसिक दडपणाखाली सतत वावरत असते . पारिवारिक आणि सामाजिक बांधिलकी जपताना तिच्या मनाची सतत घुसमट होत असते . सर्वच ठिकाणी शहरांचे विस्तार वाढत आहेत. आसपासची गावे शहरात येऊन मिळत आहेत.
आज सुशिक्षितेचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढत आहे .
पण अजूनही काही जणांची मानसिकता मात्र अशिक्षितच आहे ..
नववधू माप ओलांडून घरात येते सोबत सुखी संसाराची स्वप्न घेऊन . पण दुर्दैवाने लगेच ती विधवा झाली तर तिला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष बोलले जाते ,"काय! कपाळकरंटी होती नशीबात लग्न होताच नवरा खाऊन गेली "
असंच समजा एखाद्या मुलाचं झालं लग्न होताच त्याची बायको वारली तर त्याला कोणी असं म्हणणार नाही "काय !कपाळ करंटा आहे लग्न होताच बायकोला खाऊन गेला ."
मग काय ती नवीन सुखी संसाराची स्वप्न पाहणारी नवविवाहिता जी दुर्दैवाने विधवा झाली तरी नरभक्षीका आहे का? तीला माणसं खायचा शौक आहे का ..
तिच्यावर दैवयोगाने काळ ओढावला असताना तिचे सांत्वन करायचे सोडून तीला कपाळ करंटी नरभक्षीका संबोधून तिच्या जखमेवर मीठ चोळले जाते. .
आजही काही घरांमध्ये मुलं आणि मुली वाढवताना नेहमीच भेदभाव केला जातो .. सर्वच ठिकाणी तिला आपल्या भावनांचा स्वप्नांचा बळी द्यावा लागतो..
अशाही परिस्थितीत ती स्वत:ला सावरत मनाला धीर देत मिळालेले जीवन जगत असते .
लग्न होऊन सासरी येते तेंव्हा आजही काही घरांमध्ये स्रीस अपमानजनक वागणूक दिली जाते .. पदोपदी तिला मानसिक आणि शारीरिक छळाला सामोरे जावे लागते.
आज मोठ्या प्रमाणात महिला वर्ग सुशिक्षित आहे पण मानसिकदृष्ट्या सक्षम नसल्याने हुंडाबळी अंधश्रद्धा याला बळी पडतात ...
मुलं होत नाही तर दोष तिला वांझोटी म्हणून हिणवले जाते , घरात आर्थिक नुकसान झाले तर तीला पांढर्या पायाची म्हटले जाते., कुठवर सहन करत रहायचे तिन?
आता हे कुठ तरी थांबायलाच हवं .
मानसिकदृष्ट्या भरकटलेल्या आणि कमजोर झालेल्या समाजाला तीच्या अंतरीच्या वेदना दिसत नाहीत.
आज कमजोर आणी दुबळी होऊन ती पुन्हा पुकारत आहे कृष्णाला , "कुठे आहेस
पुन्हा अवतार घेऊन सोडव मला"
आज गरज आहे प्रत्येक पुरुषाने कृष्णाचे रुप घेऊन तिच्या मनात विश्वास निर्माण करण्याची "घाबरु नकोस तु सुरक्षित आहेस"
मगं तिच्या मनाचं नवं विश्र्व परिवर्तन होऊन ,
तिचं मन पुन्हा पुन्हा नक्कीच म्हणेल .
"पुन्हा फिरून या स्री जन्मात येईन मी "
➖➖➖➖➖➖➖➖✍🏻सुवर्णा सोनवणे
चाळीसगाव
७७४४८८००८७ .
🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा